About Kokan Bhatkanti

Boat on Beach

बाहेर पडा आणि भटकंतीचा आनंद घ्या !

कोकण भटकंतीच्या साईटवर आपले स्वागत आहे. रायगडपासून सिंधूदुर्गपर्यंत पसरलेला अथांग सागर आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्यामुळे कोकण पर्यटकांना कायमच खुणवत असतो. निसर्गाने नटलेल्या कोकणाचं वैभव म्हणजे नारळी-पोफळीची झाडं, सोन्यासारखी वाळू असणारे समुद्रकिनारे, उंचचउंच आणि रौद्र धबधबे, प्राचिन देवस्थाने, हिरवेगार डोंगर – दऱया आणि तशीच साधी सुधी माणसं. अशा या समृद्ध असणाऱ्या कोकणात फिरणं आणि आपली सुट्टी एंजॉय करणं यासारखं दुसरं सुख नाही.

 

कोकणाच्या याच रूपाला आम्ही भुललो आहोत. भटकणं हा आमचा स्थायी भाव आहे. आम्ही जरी पुण्याचे असलो तरी पुण्याबाहेरची ठिकाणं माहीत करून घेणं आणि तिथे भटकंती करणं हे आमचं एक व्यसन बनलंय. आपल्या सभोवताली फिरण्यासारखी इतकी ठिकाणं आहेत की त्यापैकी बरीचशी आपल्याला माहीतही नसतात. आणि कोठेही फिरताना येणारे अनपेक्षित अनुभव आणि अमर्याद मजा आपल्याला अशी भटकंती पुन्हा पुन्हा करण्यास प्रेरीत करते.

आम्ही काय करणार?

एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचे असेल तर तिथे कसं जायचं, कशा पद्धतीने प्रवास करायचा, तिथे बघण्यासारखं काय काय असेल. तिथे खाण्या-पिण्याची, गरज पडल्यास राहण्याची सोय असेल का, आपण रात्रभर प्लॅन करत जागत असतो. कोकण भटकंती तुम्हाला आवश्यक असणारी ही सर्व माहिती आपल्या साईटवर ठेवणार आहे. तुमची भटकंती विनासायास आणि विनाअडथळा पार पडावी, अगदी शेवटच्या क्षणाच्या ठरली तरी….!!!

 

आणि हो, केवळ आम्हीच नाही तर तुम्ही देखील तुमचे भटकंतीचे अनुभव आमच्या बरोबर शेअर करावेत असं आम्हाला वाटतं. कारण, तुमचा भटकंतीचा अनुभव इतरांना कुठेतरी त्यांचं प्लॅनींग करताना मदत करू शकेल….!!!! आणि तुमच्या अनुभवावरून आम्ही आमचीही माहिती अजुन व्यवस्थितपणे मांडू शकू असं आम्हाला वाटतं….!!!

कोकणाचं भुलवणारं सौंदर्य

एकीकडे तब्बल 720 कि.मी. लांबीचा अफाट समुद्रकिनारा आणि दुसरीकडे अभेद्य सह्याद्रीच्या कातळ डोंगररांगा… आणि यामध्यभागी वसलेलं कोकण…!!! निसर्गाने भरभरून आपलं दान कोकणाच्या पदरात टाकले आहे आणि कोकणात फिरताना हे पदोपदी जाणवते. कोकणात असणारा निसर्ग, नारळी-पोफळीच्या बागा, सुंदर चमचमणाऱया वाळूंचे समुद्रकिनारे, रौद्र सह्याद्रीचे कातळ कडे व त्यावरून कोसळणारे धबधबे, हिरव्यागार दऱया आणि शांत धीरगंभीर देवस्थानं आपल्याला खुणावत रहातात.


भौगोलिकदृष्ट्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग हे चार जिल्ह्यांचा मिळून कोकण विभाग बनलेला आहे. ठाण्यातील डहाणूपासून सुरू होणारा कोकण प्रदेश दक्षिणकडे गोव्यापर्यंत पसरला आहे. मागील 10 वर्षांपर्यंत कोकण हा तसा दुर्लक्षित राहीलेला भाग होता. मात्र येथील निसर्गाने पर्यटकांना भूरळ घातली आणि मागील दहा वर्षात कोकणाचा एक पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून सहजपणे येता येईल असे मार्ग, कोकण रेल्वे यामुळे येथे विकासाची गती वाढली आहे आणि येथील पर्यटनाचा व्यवसायही तेजीत आला आहे.

कोकणातील वातावरण

समुद्रकिनारा जवळ असल्याने कोकणातील वातावरण हे उष्ण आणि दमट स्वरूपाचे आहे. सर्वसाधारणतः 30 ते 37 से. एवढे तापमान येथे असते. येथील सर्व ऋतू हे येथे अनुभवण्यासारखेच आहेत.

 

मार्च ते मे हा कोकणातील सर्वात उष्ण काळ आहे. मे महिन्यामध्ये 40 च्यावर पारा चढतो त्याचप्रमाणे हवेतला दमटपणाही प्रचंड वाढलेला असतो.

 

कोकणात साधारण जुनपासून सप्टेंबरपर्यंत पाऊस असतो. 300 ते 900 मी.मी. पर्ज्यममान असणारं कोकण पावसाळ्यात अतिशय सुंदर भासतं. मात्र, अतिवृष्टीनं येथे पुरस्थिती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात दिवसात समुद्राला उधाणही आलेल असतं. त्यामुळे पावसाळाच्या दिवसात कोकणात समुद्रकिनारी न जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.

 

ऑक्टोबर ते फेब्रुवारी याकाळात हिवाळ्यामुळे येथील गरमी कमी असते. पारा दिवसा 20 ते 25 तर रात्री साधारणतः 15 पर्यंत राहतो. समुद्रही शांत झालेला असतो आणि हिरवळ ही फुललेली असते. कोकणात फिरायला हा सर्वोत्तम काळ आहे.

कोकणची संस्कृती

कोकणात फार पुर्वीपासून राहणाऱया लोकांना कोकणी म्हटले जाते. कोकणातील लोकं मुळातच राहण्या-वागण्यात साधे आणि आपुलकी असणारे आहेत. आपल्या परंपरा जपणं आणि त्या आचरणात ठेवणं ह्याकडे ते कटाक्षानं लक्ष देतात. कोकणात विविध सण हे त्या परंपरांना धरूनच साजरे केले जातात. यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखे सण म्हणजे शिमगा (होळी) आणि गणेशोत्सव. कोकणामध्ये मराठी आणि मालवणी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. (कोंकणी आणि मालवणी या दोन्ही वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत.)

 

कोकणाची खाद्य संस्कृतीही वेगऴी आहे. कोकणामध्ये मासे हे देखील खाद्यसंस्कृतीचाच एक भाग आहे. नारळ, लाल मिर्ची वाटून त्याच्या मसाल्याचा येथील जेवणामध्ये वापर केला जातो. त्याचप्रमाणं कोकम (आमसूल), कैरी, चिंच यांचाही जेवणामध्ये चवीसाठी उपयोग होतो.

शेती आणि फळं

कोकणात पावसाचं प्रमाण प्रचंड असल्याने भातशेती हे येथील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात आढळणाऱया खरीप आणि रब्बी हंगामातील पीकेही येथे घेतली जातात. नारळ, सुपारी यांची शेती हा एक प्रमुख शेती व्यवसाय येथे आहे. याच्याबरोबरच कोकम, काजू यांची शेतीही येथे केली जाते. त्याच्या जोडीला जांभूळ, करवंद असा रानमेवाही येथे चाखायला मिळतो. कोकणातील वातावरण रबर च्या झाडाच्या वाढीस पोषक असल्याने आता येथे अनेक कंपन्यांनी रबराच्या झाडांची लागवड सुरू केली आहे.

 

मात्र, कोकणाची ओळख आहे ती त्याच्या खास हापूस आंब्यासाठी. देवगड, रत्नागिरी, रायगड अशा अनेक ठिकाणाचा हापूस आंबा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे. आपली चव आणि वास यावर हापूसने लोकांची मनं काबीज केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

संपर्क करा

भविष्यात केवळ कोकणच नव्हे तर बाकी महाराष्ट्रपण आम्ही असाच फिरणार आहोत. त्यामुळे तुम्ही कोकणच नव्हे तर इतर ठिकाणांची माहितीसुद्धा आम्हाला कळवाल अशी अपेक्षा !


आपणांस कोकण भटकंतीबद्दल अधिक माहिती हवी असेल, आपलं लिखाणं आमच्यासोबत शेअर करायचं असेल, आम्हाला काही सुचना द्यायच्या असतील अथवा आमच्या साईटवर आपल्या व्यवसायाची माहिती द्यायची असेल तर आम्हाला kokan.bhatkanti@gmail.com या ईमेलवर ती पाठवू शकता. अथवा +91-7020430024 या आमच्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सएप करू शकता.