४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा

गणपतीपुळे (Ganpatipule) हे शांत, निसर्गसंपन्न आणि मानवी अतिक्रमणापासून (अद्यापतरी) दुर असणारं ठिकाण आहे. नैसर्गिक समुद्रकिनारा आणि आठवणीत ठेवावा अशा मार्गाने प्रवास आपली सहल अविस्मरणीय करते. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगर्द झाडी, आणि सुखाचा प्रवास करवणारे रस्ते, आजुबाजुचे वातावरण पवित्र आणि प्रसन्न करणारे गणेश मंदीर आणि समोर पसरलेला सोनेरी वाळूतला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा… आणि कोकणातली साधी माणसं… गणपतीपुळे खऱया अर्थाने आपल्याला घराजवळ असणारा अनुभव देतो.

अंतर : पुण्यापासून 320 कि.मी., मुंबईहून 342 की.मी. कोल्हापूर - 154 कि.मी., साताऱ्याहून - 214 कि.मी

गणपतीपुळे (Ganpatipule) येथील गणेश मंदिर आणि समुद्रकिनारा | A photo by kokanbhatkanti.com

गणपतीपुळे (Ganpatipule) येथील गणेश मंदिर आणि समुद्रकिनारा | A photo by kokanbhatkanti.com

रत्नागिरी जिल्ह्यात असणारं गणपतीपुळे (Ganpatipule) रत्नागिरीच्या अलिकडेच आहे. रत्नागिरीपासून केवळ २०-२२ कि.मी. अंतरावर गणपतीपुळेसाठी फाटा फुटतो. या रस्त्याने सरळ आपण गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन पोहोचतो. गणपतीपुळे आपल्या स्वयंभू गणपती देवस्थान आणि चमचमणाऱया सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण म्हणजे अध्यात्मिक आणि विविध उपक्रम यांचा सुरेख संगम आहे. कुटुंबासहीत सहलीचे हे सर्वोत्तम ठिकाण आहे. ४०० वर्षे जुने असणारे हे गणेशाचे मंदीर समुद्राच्या किनारी एका छोट्या टेकडीच्या पायथ्याशी बसलेले आहे. येथील प्रदिक्षणा मार्ग हा मंदिराभोवतालच्या टेकडीला वळसा घालून आहे. हे गणेश मंदीर पश्चिममुखी असल्याने याला पश्चिमद्वारपालक असेही म्हटले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी या दोन्ही गणेश चतुर्थींना येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

या गणपती मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. त्याप्रमाणे हा गणपती मुळचा येथून जवळच असणाऱया गणेशगुळे गावात वसला होता. त्या गावातल्या लोकांवर रागावून हा गणपती येथे येऊन वसला असे सांगितले जाते. गणपतीपुळेचा समुद्र हा जरी सोनेरी वाळूचा असला तरी तो धोकादायक आहे. या समुद्राचे पाणी प्रवाही असून पाण्यात अनेक ठिकाणी भवरे आहेत. त्याचप्रमाणे समुद्रही समतल नाही. आणि तशी माहिती देणारा बोर्डही येथे लावलेला आहे. येथे यापुर्वी झालेल्या दुर्घटना बघता येणाऱया भाविकांनी खोल समुद्रात उतरू नये हेच उत्तम. येथून जवळच जयगडचा किल्ला आणि प्राचीन कोकण हे प्रदर्शन ही बघण्यासारखी ठिकाणे आहेत.

गणपतीपुळेला कसं जाल?

खाजगी वाहनाने आपण येणार असाल तर मुंबई - गोवा महामार्गाने आपण येऊ शकता. किंवा मुंबई - बँगलोर महामार्गाने आपणास गणपतीपुळे येथे येता येऊ शकता. गणपतीपुळे येथे जाण्यासाठी एस.टी. बसेस तसेच खाजगी बसेस देखील उपलब्ध आहेत. साधारणतः रात्री या गाड्या सुटतात आणि सकाळी गणपतीपुळे येथे पोहोचतात. तसेच

रेल्वेने जात असल्यास जवळील रेल्वे स्टेशन ५० कि.मी. अंतरावरील रत्नागिरी हे आहे. तेथून आपण खाजगी वाहनाने किंवा एस.टी.ने गणपतीपुळे येथे जाऊ शकता.

विमानाने येणार असल्यास जवळील विमानतळ रत्नागिरी हे आहे. तेथून आपण खाजगी वाहनाने किंवा एस.टी.ने येथे येऊ शकता.