अलिबाग बीच

Alibaug Beach
अलिबाग किल्ल्याचे प्रवेशद्वार | A photo by Kokan Bhatkanti

एकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण

रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग (Alibaug) पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचे एकदिवसीय ट्रीपसाठी आवडते बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे केवळ 3-4 तासात पोहोचण्याचे नियोजन करता येते. आणि त्याचमुळे पर्यटक झटपट ट्रीपसाठी या ठिकाणास पहिली पसंती देतात.

काळसर पण मऊशार वाळू असणारा समुद्र किनारा, नारळीची झाडं आणि कुलाब्याचा किल्ला हे येथील लोकप्रिय आकर्षणं आहेत. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबागचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ तास-दोन तासाच्या प्रवासात बरेच समुद्रकिनारे तुम्ही पाहू शकता.

कुलाबा असं नाव असणाऱ्या खेड्याला आतांच अलिबाग (Alibaug) हे नाव मिळण्यालाही इतिहास आहे. असं सांगितलं जातं की, येथे राहणाऱ्या इस्त्रायली अली नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या आंबा आणि नारळाच्या बागा या भागात होत्या. अलीची बाग या नावाने त्याकाळी प्रसिद्ध असणाऱ्या या गावाचे नाव पुढे अलिबाग असं रूढ झालं. येथे इस्त्रायली आळी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भागामध्ये ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सतराव्या शतकात अलिबागचा विकास केला. एक पर्यटन स्थळ म्हणून अलिकडच्या काळात अलिबागचा चांगलाच विकास झालाय. हॉटेल्स आणि फुड जंक्शन्सची बरीच रेलचेल आता तुम्हाला इथे दिसू शकेल.

अलिबागमध्ये भेट देण्यासाठी डझन भर समुद्रकिनारे आहेत. अलिबागच्या मुख्य समुद्रकिनाऱ्या बरोबरच वर्सोली, आक्शी, नागाव, किहीम, आवास, सासवाणे, रेवास, चौल रेवदंडा, काशिद आणि कोरलाई हे साधारणपणे 30 कि.मी. च्या परिघात असणारे समुद्रकिनारे अलिबागच्या जवळपास म्हणून तुम्ही भेट देऊ शकता. उंदेरी किल्ला आणि खंदेरी ही बेटे देखील अलिबाग जवळ आहे. याशिवाय सिद्दीला शह देण्यासाठी आणि मुंबईकर इंग्रजांवर वचक बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कुलाब्याचा किल्ला हे देखील एक आकर्षण आहे. याशिवाय ओहोटीच्या काळामध्ये तुम्ही आपले पाय ओले करत या किल्ल्यापर्यंत चालत जाऊ शकता. किल्ल्याच्या आत गणपतीचे सुंदर मंदिरदेखील आहे. राहण्याची आणि खाण्या-पिण्याची आपल्या बजेटनुसार सोय हे देखील अलिबागमध्ये शक्य आहे. त्याचप्रमाणे कनकेश्वराचे मंदिर, ब्रह्मकुंड ही ठिकाणे देखील भेट देण्यासारखी आहेत.