- CITY : छत्रपती संभाजी नगर
- CATEGORY : वारसा स्थळे
अख्ख्या डोंगरात कोरलेला ह्या बारा लेण्यांचा समुह आहे. छत्रपती संभाजी नगर शहरापासून साधारणपणे २० कि.मी अंतरावर या लेण्या आहेत. लेण्या पाहण्यासाठी डोंगरामध्ये पायथ्यापासून पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायथ्याशी अनेक लोकांनी आपल्या प्रिय गेलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ बौद्ध मुर्त्यांच्या रूपाने स्मारक जतन केलेले आहेत. येथे विविध प्रकारच्या लहान-मोठ्या बौद्ध मुर्त्या बघायला मिळतात. हळू हळू थांबत या पायऱ्या चढून गेल्यावर तुम्हाला समोर हा लेण्यांचा समुह दिसतो. हा लेणी समुह पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. लेणी पाहण्यासाठी २५ रूपये इतके शुल्क आहे. डोंगरावर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. आम्ही संध्याकाळी साधारण ४-४.३० च्या सुमारास गेलो होतो. फारशी गर्दी नसल्याने तुम्ही या लेण्या निवांतपणे २ तासात बघू शकता.
या लेण्यांचा इतिहास पाहिला तर साधारणपणे सहाव्या ते आठव्या शतकात या लेण्या खोदल्याचे दिसून येते. या लेण्या तीन भागात विभागलेल्या आहेत. एक ते पाच लेणी पहिल्या विभागात, सहा ते नऊ या लेणी दुसऱ्या विभागात आणि दहा ते बारा या लेणी तिसऱ्या विभागात अशा पद्धतीनं या लेण्या विभागण्यात आलेल्या आहेत. ज्या डोंगरात या लेण्या कोरल्या आहेत तो बेसाल्ट प्रकारचा दगड आहे. या लेण्यांच्या परिसरातील डोंगरमाथ्यावरून दुरवर पसरलेले छत्रपती संभाजी नगर शहर आणि त्याच्या मध्ये असणारा बीबी का मकबरा असे विहंगम दृष्य सहजपणे दिसते. फारशी माहितीत नसणारी प्राचीन ठिकाणे बघण्याची आवड असेल तर येथे नक्कीच भेट दिली पाहिजे.
यातील पहिल्या लेण्यामध्ये बौद्ध विहार असून आतील काम अर्धवट राहिले आहे. बांधकाम पाहता सुमारे २८ खांब असावेत. मात्र त्यापैकी चार अर्धवट नष्ट झालेले खांब आता राहिले आहेत. सुमारे ८ खांबांचा वरांडा असून त्यावरिल दारावर नागराज आणि यक्षिणींच्या आकृत्या दिसतात तर खांबांवर सलभंजिका आणि गणांच्या आकृत्या काढलेल्या दिसतात. दुसऱ्या गुफेमध्ये मध्यभागी धम्मचक्र मुद्रेतील हात असणारी आणि प्रलंबपादासनामध्ये सिंहाच्या तख्तावर बसलेली गोतम बुद्धांची मुर्ती आहे. या तख्ताच्या बाजूने यक्षिणींच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. तिसरी गुफा ही विहार असून यामध्ये मध्यभागी गौतम बुद्धांची आपल्या शिष्यांना ज्ञान देणारी मुर्ती आहे. चौथ्या गुफेमध्ये चैत्यगृह असून दुर्दैवाने केवळ एकच मुळ खांब तेथे शिल्लक आहे. पाचवी गुफा ही जरा मोठी असून त्यामध्ये गौतम बुद्धांची शांत चित्ताने ध्यानस्थ बसलेली मुर्ती आहे.
सहाव्या, सातव्या, आठव्या गुफेमधील बांधकाम बघून अजंठा येथील बांधकामाची समानता वाटते. या गुफांमध्ये गौतम बुद्धांच्या विविध ध्यानातील मुर्त्या असून त्याभोवती त्यांचे अनुनयी, हत्ती, मकर वगैरेंच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. आठव्या क्रमांकाची गुफा ही या सर्व समुहामध्ये अत्याधिक व्यवस्थित बांधलेली आहे असं म्हणता येऊ शकेल. नऊ आणि दहा क्रमांकांच्या गुफांची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे.
अकरा आणि बारा क्रमांकाच्या गुफा या डोंगराच्या मागील बाजूस असून साध्या पद्धतीच्या खांबामधून बांधलेले गेलेले हॉल या पद्धतीच्या आहेत. या गुफांकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही असे आम्हाला सांगण्यात आले. या लेणी समुहात सर्वाधिक सुंदर आम्हाला वाटलेली गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांची ध्यानस्थ मुर्ती. या मुर्तीकडे बघताना तुमचं मन अत्यंत शांत होत जातं असा आमचा वैयक्तिक अनुभव आहे. या लेण्या परिसराच्या डोंगरात धबधबा ही आहे जो पावसात सुरू होतो. ह्या धबधब्याचे पाणी जिथून जातं तिथे छोटासा पुल बांधलेला आहे. थोडक्यात थोडंसं फोटोशूट तर नक्कीच होईल. म्हणूनच, जरी थोड्याशा त्रासदायक असणाऱ्या उंच पायऱ्या चढाव्या लागल्या तरी त्या चढून जा आणि या लेणीसमुहाला नक्की भेट द्या.