भुलेश्वर मंदिर

यवतजवळील प्राचिन आणि शांत असे महादेवाचे पांडवकालीन मंदिर

पुणे जिल्ह्यामध्ये प्राचिन आणि ऐतिहासिक अशी बरीच धार्मिक स्थळे आहेत. अशाच  प्राचिन धार्मिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे भूलेश्वर देवस्थान. पुण्यापासून केवळ 50 कि.मी. अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ हे महादेवाचे देवस्थान आहे. एका डोंगरावर वसलेले हे मंदिर पांडवकालीन असून शांत आणि धीरगंभीर वातावरणामुळे आपले येथे जाणे एक सुखकर अनुभव ठरतो.

या मंदिराचे बांधकाम आठव्या शतकातील आहे. या मंदिराच्या भिंतींवर असणाऱया शिल्पाकृतींमुळे या मंदिराच्या सौदर्यात भरच पडते. पेशव्यांचे आणि साताऱयाच्या शाहू महाराजांचे गुरू असणाऱया श्रीब्रम्हेंद्र महाराजांनी अठराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नगारखान्याबरोबरच मंदिरापुढील मंडपाचे काम त्यांनी केले. या मंदिराभोवती बांधलेल्या भिंतीचे काम बाराव्या शतकातील असण्याची शक्यता आहे. याचे एक कारण म्हणजे दोन्ही दगड वेगवेगळे आहेत. तसेच गाभाऱयातील पिंडीवर होणाऱया अभिषेकाचे तीर्थ एका कुंडामध्ये साचवले जाते.

या मंदिराभोवती असणाऱया दौलत मंगल गडाचे भग्न बुरूज येथे एक किल्ला असावा याची साक्ष देतात. काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमणांमध्ये शिल्पांना झळ बसली असली तरी त्याची मुळची कलाकुसर आजच्या अवस्थेतही जाणवण्यासारखी आहे. भुलेश्वराच्या या मंदिराच्या वरच्या भागातून खाली पाहीले तर आजुबाजूच्या परिसरातील भग्न अवशेषातून परकीय आक्रमणाचा किती फटका या भागाला बसला असेल त्याची कल्पना येते.

महाशिवरात्री आणि श्रावणातील सोमवार ह्या दिवसांमध्ये या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते.  मंदिराच्या बरोबरच आपण जवळच असणाऱया सासवड येथून मोरगावच्या मोरेश्वराला तसेच जेजुरीच्या खंडेरायाला देखील भेट देऊ शकता.