दौलताबाद देवगिरीचा किल्ला

शक्तीशाली राजवटींचे केंद्र असणारा शक्तीशाली किल्ला

देवगिरीचा किल्ला छत्रपती संभाजी नगर-वेरूळ मार्गावर छत्रपती संभाजी नगरपासून 16 कि.मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर ज्या थोड्या किल्ल्यांच्या वर्चस्वासाठी विविध राजसत्तांच्या धडपडीचा इतिहास आहे त्यामध्ये दौलताबाद प्रामुख्याने पुढे आहे. 11 व्या शतकात यादव साम्राज्याच्या राजांनी हा किल्ला बांधला. भगवान शंकर हे एकेकाळी या पर्वतांवर वास्तव्यास होते अशी एक पौराणिक कथा आहे. त्यावरूनच या भागाला देवगिरी म्हणजे देवतांच्या निवासाची टेकडी असं म्हटलं जाई. राजा रामचंद्र असण्याच्या काळात 1296 मध्ये अल्लादीन खिल्जीने देवगिरीवर आक्रमण केले. हे या किल्ल्यावरील पहिले परकीय आक्रमण होते. अल्लादीनने रामचंद्रांचा पराभव करत त्यांच्याकडून भरभक्कम खंडणी वसूल केली. काही काळानंतर ही खंडणी थांबताच पुन्हा एकदा हल्ला करत खिल्जीने यांना कायमस्वरूपी आपलं मांडलिक बनवून टाकलं.

देवगिरी किल्ला इतिहासात उल्लेखनीय राहण्याचं अजून एक कारण म्हणजे खिल्जीनंतर आलेल्या महंमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीकडे हलवणं हे होतं. 1327-28 मध्ये महंमद तुघलकानं आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलविण्याचा निर्णय घेतला. राजधानीबरोबर दिल्लीतील लोकांनादेखील हलविण्याचं फर्मान त्याने सोडलं. देवगिरी हे साम्राज्याच्या मध्यभागी असणं आणि देवगिरीचा भक्कम किल्ला याबरोबरच स्रवच ठीकाणी लक्ष ठेवणं सोपं जाणं ही कारणे त्यामागे असल्याचं काही इतिहासकार सांगतात. तुघलकाने देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. मात्र, एकुणच राहणीमानाच्या विरूद्ध असणारं कोरडं वातावरण आणि जवळील नदीवरून पाणी उचलून तयार केलेले पाण्याचे साठे असून देखील जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल हे पाहता त्याने पुन्हा एकदा आपली राजधानी दौलताबादहून दिल्ली येथे हलविली.

सुमारे 200 मी. उंच शंकुच्या आकाराच्या डोंगरावर वसलेला दौलताबाद किल्ला मध्ययुगीन भारतीतल सर्वात भक्कम आणि शक्तिशाली किल्ला म्हणून ओळखला जात असे. प्रचंड विस्तार असणारा या किल्ल्याला सभोवताली सगळीकडे बुरूज आणि दरवाजे असणाऱ्या तीन तटबंद्या आणि दोन खंदक होते. एका राजवटीतून दुसऱ्या राजवटीमध्ये स्थलांतरीत होत असताना किल्ल्याचा विस्तार आणि वास्तू त्यात जोडल्या गेल्या. सध्याच्या काळात तुम्ही तेथे मोटीचे अवशेष, ढासळलेली विहीर, दरबार, भारतमातेचे मंदिर, दिवाण-ए-आम, पाण्याचे टाके, हम्मामखाना यांचे अवशेष राहू शकता. या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यात येण्या-जाण्यासाठी असणारे एकच दार. अनेक दरवाजे ठेवणाऱ्या त्याकाळच्या किल्ल्यांमुळे दुसरे दार शोधत शत्रू आतपर्यंत जाई आणि आपसुकच स्वतःच्या विनाशाकडे खेचत जाई. शत्रुला गोंधळात टाकील अशा अनेक जागा या किल्ल्यात त्याकाळी बनवलेल्या होत्या.

तुघलकांनंतर हसन गंगु याच्या नेतृत्वाखाली बहमनी साम्राज्याने दौलताबादचा ताबा घेतला. त्यानंतरच्या काळात अहमदनगरच्या निजामशाहीने दौलताबादचा कब्जा केला आणि त्याला आपली राजधानी बनविली. त्यानंतर 16व्या शतकात सुमारे चार महिन्याच्या वेढ्यानंतर हा किल्ला मुघल्यांच्या हाती गेला. याच ठिकाणाहून औरंगजेबाने आपल्या आदिलशाही आणि कुतूबशाहीविरूद्धच्या मोहिमांचे काम चालिवले. 17 व्या शतकात निजामाच्या ताब्यात जाण्यापुर्वी काही काळ हा किल्ला मराठ्यांच्या देखील ताब्यात राहिला होता.

दौलताबाद किल्ला बघण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या सभोवताल असणारा सुमारे 54 बुरूजांचा महकोट. ही तटबंदी सुमारे 5 कि.मी. एवढी लांब पसरली आहे. सुमारे 25-30 फुट उंचीच्या या तटबंदीच्या भिंती 8-10 फुट रूंद आहेत. याशिवाय उत्तम पाणी साठा करू शकणारा अवाढ्यव्य आकाराचा हत्ती हौद बघण्यासारखा आहे. तीन बाजूंनी तळाकडे जाणाऱ्या पायऱ्या असणाऱ्या या हौदात गुरूत्वाकर्षणाच्या नियमाने पाणी आणले आहे. तुघलकी काळात बांधलेले हम्मामखाने हा एक वैशिष्ट्यपुर्ण आराखडा आहे. स्वच्छ पाणी आणण्यापासून ते आंघोळ झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी केलेली पाईपलाईनची सोय हे पहाण्यासारखे आहे. याशिवाय बहमनी राजा हसन गंगु ने येथे चांदमिनार नावाची इमारत बनविली. दिल्लीच्या कुतुबमिनारच्या धर्तीवरील चांदमिनार आजही आपण येथे पाहू शकता.

Advertise With Us
Advertise With Us