- CITY : सातारा
- CATEGORY : हिंदू मंदिर
वाई शहराची अजून एक ओळख म्हणजे महाभारतातील प्राचिन विराट नगरी. कृष्णा नदीच्या काठावर बांधण्यात आलेले सात घाट आणि या घाटांवर बांधलेली मंदीरे यामुळे हे शहर मंदीरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
या अनेक घाटांपैकी एक असणाऱया गणपती घाटावर हे महागणपतीचे मंदीर बांधलेले आहे. या मंदीरासमोरच काशी विश्वेश्वराचे मंदीरही आहे. 1762 साली पेशव्यांचे नातेवाईक असणारे गणपतराव रास्ते यांनी हे मंदीर बांधले आहे. या मंदीरात वसलेली शेंदूरी रंगातली महागणपतीची मुर्ती ही एकाच अखंड दगडातून घडवलेली असून त्याच दगडातून काशीविश्वेश्वरासमोरील नंदीची मुर्तीदेखील घडवलेली आहे असा एक उल्लेख आहे. या मंदीरास त्यावेळेस सुमारे दीड लाख रूपये खर्च आला असल्याचा उल्लेख आढळतो.
हे मंदीर घडीव दगडातून बांधण्यात आलेले आहे. याचा अंतर्भाग अत्यंत ऐसपैस असून गाभाऱयातील गणपतीच्या मुर्तीसमोर भरपूर मोकळी जागा आहे. गाभाऱयातील जमीन ही घडीव दगडातूनच बांधण्यात आलेली आहे. या मंदीरातील प्रसन्न भाव असणारी गणेशाची मुर्ती ही साधारणतः 10 फुट उंच असून 8 फुट रूंद आहे. त्याच्या या आकारामुळेच या गणेशमुर्तीला ढोल्या गणपती म्हणूनही ओळखले जाते. या मंदीराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदीराचा मागील भाग. देवाच्या मुर्तीमागील भिंतीचा भाग हा माशाच्या शेपटीप्रमाणे बांधलेला आहे. पुराच्या पाण्यामुळे मंदीराचे नुकसान होऊ नये हा यामागील हेतू होता. या गणेशाची उंची कमी-जास्त होते अशी एक समजूत येथील भाविकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे, हा गणपती नवसाला पावतो अशी येथे भेट देणाऱया भाविकांची श्रद्धा आहे.
या गणपतीला मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देतात. येथून जवळच म्हणजे साधारण 50 कि.मी. अंतरामध्ये पाचगणी आणि महाबळेश्वर ही दोन थंड हवेची ठिकाणे असल्याने तेथे जाणारे पर्यटकही वाईला ढोल्या गणपतीच्या दर्शनास येतात. त्यामुळे येथे वर्षभर वर्दळ असते.