गुहागर

सर्वात लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं ठिकाण

कोकण किनारपट्टीमधील सर्वात लांबलचक किनारा लाभलेल्या गुहागरची हे शांत, सुंदर आणि सोनेरी वाळू असलेला किनारा अशी एक वेगळी ओळख आहे. दोन डोंगरांच्या मध्ये जवळ जवळ सहा किलोमीटरचा किनारा गुहागरला लाभलाय. या किनाऱ्याला लाभलेली नारळी-पोफळी बरोबरची सुरूची वने, काजू, फणस, आंबा यासारखी फळे, जयगड सारख्या किल्ल्याचे भग्नावशेष, प्राचिन आणि पवित्र असं वातावरण असणारी मंदिरे आणि अस्सल कोकणी संस्कृती अनुभवायची असेल तर गुहागरला एकदा तरी यायलाच पाहिजे.

समुद्रकिनारा आणि तिथली मजा हे गुहागरचे प्रमुख वैशिष्ट्य असले तरी व्याडेश्वर मंदिर आणि दुर्गादेवी मंदिर हे देखील गुहागरचे एक प्रमुख आकर्षण आहे. गुहागर शहरापासून जवळच वेळणेश्वर आणि हेदवी ही दोन प्राचिन आणि लोकप्रिय स्थळे वसलेली आहेत. त्याचबरोबर जयगडचा किल्ला, गोपाळगड, दाभोळ बंदर, अंजनवेल येथील दिपगृह ही देखील गुहागरच्या आसपास असणारी बघण्यासारखी स्थळे आहेत.

कोकणातील इतर ठिकाणांसारखेच राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या सर्व सोयी गुहागरला आहेत. छोटे हॉटेल्स, घरगुती व्यवस्था अशी राहण्याची सोय गुहागरमध्ये आहे. याच्या बरोबरच शाकाहारी, मांसाहारी आणि बरोबर कोकणी पद्धतीचे मासे यामुळे तुमचे जिभेचे चोचले देखील पुरवले जातात.

नोव्हेंबर ते मार्च हा गुहागरमध्ये फिरण्याचा सर्वोत्तम काळ आहे. बाकी उकाड्याच्या गरमीचा अनुभव घ्यायचा असेल तर एप्रिल-मे मध्ये देखील आपण गुहागर फिरू शकता. कोकणातील पाऊस हा रौद्र असतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गुहागर शक्यतो टाळा. तरिपण कोकणातला पाऊस बघायचाच असेल तर आपण जाऊ शकता. मात्र, अशा वेळेस समुद्रकिनाऱ्यापासून लांब रहाणंच उत्तम !!!

Advertise With Us
Advertise With Us