कार्ला लेणी

शिल्पकलेचा अद्भूत प्राचिन वारसा

या सर्व लेण्यांमध्ये सर्वात मोठे चैत्यगृह म्हणून कार्ला लेण्याचा उल्लेख करावा लागेल.

पुणे - मुंबई महामार्गावर पुण्यापासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर लोणावळ्याजवळ कार्ला या गावाजवळ ही लेणी आहेत. सुमारे 2000 वर्षापुर्वी अखंड पहाडात कोरलेल्या या लेण्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. सातवाहन काळात तयार झालेली ही लेणी सर्वात प्राचिन लेणी समजली जातात. तत्कालीन हिनयान पंथीय या लेण्यांमध्ये एकुण 16 गुंफा असून त्यातील 8 क्रमांकाची भव्यदिव्य वास्तू म्हणजे चैत्यगृह. या चैत्यगृहामध्ये आतल्या बाजूस स्तूप असून या ठिकाणी बौद्ध भिख्खु आपल्या ध्यानधारणेसाठी येत असत असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. सुमारे 40 मी. लांब आणि 14 मी. रुंद आणि तेवढेच उंच अशा या चैत्यगृहामध्ये कोरलेले अजस्त्र असे खांब आणि त्या खांबांवर कोरलेली शिल्पं म्हणजे प्राचिन शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणावा लागेल. या ठिकाणी लेणी कोरताना वापरले गेलेले लाकडी खांब हे अजुनही सुस्थितीत आहेत.

या अजस्त्र अशा कोरलेल्या लेण्याच्या बाहेर एका खांबावर चार सिंहाचे शिल्प कोरलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात केवळ कान्हेरी आणि कार्ला अशा दोनच ठिकाणी अशी सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. मुख्य चैत्यगृहात आत जाताना दोन्ही बाजूस दगडात कोरलेले हत्तींची शिल्प आपलं लक्ष वेधून घेतात. या चैत्यगृहाच्या भिंतीवर बुद्धांची आणि समकालीन अनेक शिल्पे कोरलेली आहेत. अत्यंत सुंदर आणि बांधेसुद अशी ही शिल्पे बघणाऱयाचे मन मोहून घेतात. या लेणी पाहण्यासाठी केवळ पुण्या-मुंबईच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक देखील येतात. पुर्वीच्या काळी अरबी समुद्र ते दख्खन या व्यापारी रस्ता होता. अनेक व्यापारी विश्रांतीसाठी या लेण्यांचा आसरा घेत असत. या लेण्यामधील अनेक गुंफा आता बंद झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पायऱया वा चढण्याची सोय नसल्याने वर जाता येत नाही.

या लेण्याच्या शेजारीच एकविरा देवीचे मंदिर आहे. कोळी समाजाची कुलदैवत असणाऱया एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी इथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार सकाळी 9 ते सायांकाळी 5.30 या वेळेत तुम्हाला लेणी पाहता येतात. लेणी पाहण्यासाठी पाच रुपये प्रवेश शुल्क असून, वैयक्तिक व्हिडीओ शुटींग करायचे असल्यास व्हिडीओ कॅमेरा नेण्यास 25 रूपये चार्ज आहे. वर्षभरात केव्हाही आपण या ठिकाणास भेट देऊ शकता. भारतातील या प्राचिन आणि सुंदर अशा रचनेस एक वेळ तरी नक्कीच भेट द्या.

Advertise With Us
Advertise With Us