काशिद बीच

Kashid Beach
काशिद फॅमिली बीच | A Photo by Kokan Bhatkanti

चमचमणाऱया वाळूने सजलेला सुंदर समुद्रकिनारा

अलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून 30 कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.

दोन टेकड्यांच्यामध्ये असणारा आणि साधारणपणे तीन किलोमीटर पसरलेला समुद्रकिनारा इथे येणाऱया पर्यटकांना आपली सुट्टी सत्कारणी लागल्याची भावना देतो. कोकणात असणाऱया सर्वोत्तम बीचमध्ये काशिदची गणना करता येईल. वीकेंडचे ‘बेस्ट डेस्टीनेशन’ असणारे काशिद इतर वेळेस मात्र शांत शांत असतं.

काशिदला समुद्राच्या लाटा थोड्या उसळणाऱया असल्याने सर्फींग करणाऱयांसाठी ही पर्वणी असली तरी पावसाळ्यात या लाटांवर खेळण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. वर्षभर जरी गर्दी खेचत असले तरी जून ते सप्टेंबर या काळात वादळी पावसाच्या दिवसात काशिद टाळणं उत्तम. समुद्रकिनारी तासन् तास बसून राहणं आणि तिथला सुर्यास्त बघणं हा एक आनंददायी अनुभव आहे. काशिदच्या मुख्य बीचवर असणारी गर्दी टाळायची असेल तर मुरूडकडे जाणाऱया रस्त्यावर साधारण तीन कि.मी. पुढे काशिद फॅमिली बीच आहे. आपण कुटुंबासोबत असाल तर इथेच समुद्रात खेळण्याचा आनंद लुटा असं आम्ही सुचवतो. याच समुद्रकिनाऱयाच्या पलिकडे आपल्याला राहण्यासाठी घरगुती सुविधांपासून ते रिसॉर्टपर्यंत आपल्या बजेटनुसार सोयी आहेत.

काशिदपासून जवळच आपणांस बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. मुरूडचा जंजीरा, रेवदंड्यांचं बिर्ला मंदीर, अलिबागला असणारा कुलाब्याचा किल्ला, आणि अलिबाग बीच ही यातील मुख्य ठिकाणं. जर तुम्ही दोन दिवसांची ट्रीप प्लॅन करत असाल तर ही सर्व ठिकाणं आपण बघू शकाल. मुंबई आणि पुण्यापासून महामार्गाने आपण येथे सहज पोहोचू शकाल. सहकुटूंब सुट्टी साजरी करण्याचा सर्वोत्तम जागा म्हणूनच काशिदचा उल्लेख करावा लागेल.