महाबळेश्वर

साताऱ्याजवळील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण

सर्वसाधारणपणे 16-20 डिग्री सेल्सियस एवढे तापमान असणारे महाबळेश्वर थंडीमध्ये गारठून जाते. एकुणच काय तर वर्षाच्या बाराही महिने इथे अत्यंत सुखद वातावरण असते. त्यामुळेच एकेकाळी उन्हाळ्यामध्ये भेट देण्याचे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असणारे महाबळेश्वर आता वर्षाचे बाराही महिने वेगवेगळ्या ऋतुंचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांनी गजबजलेले असते.

पश्चिम घाटामध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 1372 मी. उंचावर महाबळेश्वर वसलेले आहे. महाबळेश्वर (महाबलेश्वर) याचा अर्थ प्रचंड बळ असणारा ईश्वर (देव). सर्वत्र पसरलेले सह्याद्रीचे डोंगर, खोल दऱ्या आणि सर्वत्र पसरलेला निसर्ग असंच महाबळेश्वरचं वर्णन करावं लागेल. इंग्रज काळामध्ये महाबळेश्वर ही उन्हाळी राजधानी होती. ब्रिटीश राजच्या दरम्यान 'माल्कम पेठ' असं नाव जरी दिलं गेलं असलं तरी त्याही आधीपासून या शहराचे नाव महाबळेश्वर असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं जातं. जवळपास तीस निरनिराळे पॉईंट्स, वेण्णा लेक, पंचगंगा व जुनं महाबळेश्वराचं मंदिर आणि थंड हवामान पर्यटकांना महाबळेश्वरला खेचून आणते. निसर्गवेड्या ट्रेकर्स पासून, प्राणी-पक्षी निरीक्षकापर्यत आणि सुटी घालवण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांपासून ते शुटींग करायला जागा शोधणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकापर्यंत सर्वांनाच महाबळेश्वरचे आकर्षण असते. महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन जवळ जवळ असणारी ठिकाणे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

महाबळेश्वरमध्ये सर्वसाधारणपणे जाण्याची सर्वोत्तम वेळ ही मार्च ते जून आहे. पण आजकाल महाबळेश्वर हे वर्षभर गजबजलेले असते. थंडीच्या काळातील इथले वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक येथे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळामध्ये येतात. तर इथला धुवाधार पाऊस झेलण्यासाठी तरूणाई आणि ट्रेकर्स येथे जुन ते सप्टेंबर महिन्यात गर्दी करते. महाराष्ट्रातील हनीमुन कपल्सचे महाबळेश्वर हे एक आवडतं ठिकाण आहे.

महाबळेश्वरमध्ये भेट देण्याची ठिकाणे :

 • जुनं महाबळेश्वर :

  आताच्या महाबळेश्वरपासून जवळच जुनं महाबळेश्वर (क्षेत्र महाबळेश्वर) वसलेले आहे. अनेक प्राचीन मंदिरे येथे आहेत.

 • पंचगंगा मंदिर :

  कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या नद्यांना एकत्र आणणारं पंचगंगा मंदिर हे एक प्रसिद्ध प्राचिन मंदिर आहे. असं मानलं जातं की, हे मंदिर 4500 वर्षे जुने आहे.

 • महाबळेश्वर मंदिर :

  12व्या शतकात बांधले गेलेले हे भगवान शंकराचे मंदिर हेमाडपंथी प्रकारामध्ये बांधले गेले आहे. या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीबरोबरच सुमारे तीनशे वर्षापासून भगवान शंकराची शेज, डमरू आणि त्रिशुळ देखील ठेवले आहे. असं मानले जातं की, भगवान शंकर येथे रात्रीस निद्रा घेतात आणि रोज सकाळी त्यांच्या शेज विस्कटलेल्या अवस्थेत असते.

 • कृष्णा मंदिर :

  पंचगंगा मंदिरापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर कृष्णामाईचे मंदिर आहे. या जागेला कृष्णा व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. कृष्णा नदीचा इथे उगम होतो असं मानलं जातं.

याशिवाय वेण्णा तलाव, आर्थर्स सीट, केट पॉईंट, सनसेट पॉईंट, विल्सन पॉईंट, लॉडविक पॉईंट, एलीफंट्स हेड पॉईंट, एलफिंट्सन पॉईंट, होली क्रॉस चर्च, एको पॉईंट, हंटींग पॉईंट, टायगर स्प्रिंग इत्यादी ठिकाणे अतिशय प्रसिद्ध आहे.

Advertise With Us
Advertise With Us