नरनाळा किल्ला शाहनूर किल्ला या नावाने देखील ओळखला जातो. राजपूत राजा नरनाळा सिंह याच्या नावावरून या किल्ल्यास नरनाळा हे नाव पडले असा उल्लेख काही ठिकाणी आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे नरनाळा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 900 मीटर उंचीवरील हा किल्ला उन्हाळ्यातील गरम वातावरण सोडल्यास आपणांस सुखकर अनुभव देतो. ऐतिहासिक संदर्भांनुसार की गोंड जमातीच्या राजाने हा किल्ला बांघला. 1400 च्या सुमारास बहमनी साम्राज्यामध्ये उत्तरेची आक्रमणे रोखण्यासाठी या किल्ल्याची डागडूजी केली गेली. नरनाळा किल्ला बहमनी, निजामशाही, मुघल, मराठा आणि हैद्राबादची निजामशाही अशा अनेक सत्तांच्या ताब्यात वेळोवेळी राहिला. 1818 मध्ये इस्ट इंडीया कंपनीच्या आणि पर्यायाने इंग्रजांच्या ताब्यात हा गड गेला.
1857 च्या उठावामध्ये या किल्ल्याचा महत्वपुर्ण सहभाग होता असे काही माहिती इतिहासामध्ये दिलेली आहे. बहमनी पासून मराठ्यांपर्यंत निरनिराळे शासक या किल्ल्याला लाभले. आणि या सर्वांची छाप या किल्ल्याची वास्तुशैली पाहिली तर दिसून येते. बहामनी पद्धतीचे दरवाजे, भव्य मुघली कमानी, तत्कालीन मराठा बगीचे आणि उद्याने यांच्या खुणा पाहत रहाण्यासारख्या आहेत. विविध बंधारे, कृत्रीम तलाव आणि कारंजांच्या रूपामध्ये पाणी संपुर्ण किल्ल्यामध्ये खेळवले आहे ते बघण्यासारखे आहे. नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या तटबंद्या वगळता सुमारे 38 कि.मी. ची तटबंदी या किल्ल्याला आहे.
जवळपास 392 एकर पसरलेल्या आणि एकेकेळी 22 द्वार व 360 बुरूज असणाऱ्या या किल्ल्याची तटबंदी तीन पदरी आहे. वाघ दरवाजा, मेहंदी दरवाजा, महाकाली (नक्षी) दरवाजा, अकोट आणि दिल्ली दरवाजा बहामनी स्थापत्य शास्त्राची ग्वाही देतात. या काळातील दोन शिलालेख नक्षी दरवाजावर आढळून येतात. गजशाला, अंबर महाल, शाहीमहरम (जनानखाना), जामा मस्जिद, तेलाचे आणि तुपाचे टाके, नगरखाना, कुंडली बुर्ज (शस्त्रांचा कारखाना) याशिवाय अनेक थडगी आणि दर्गा या किल्ल्यामध्ये आहेत. किल्ल्यावर असणाऱ्या तोफा, त्यातला त्यात नौगज ही तोफ आपल्या आकारावरून त्यावेळच्या शस्त्र निर्मितीची कल्पना देते.