किल्ले पद्मदुर्ग

मुरूड जंजिऱ्याला आव्हान देणारा किल्ला

हा किल्ला काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तर काही ठिकाणी संभाजी महाराजांनी हा किल्ला बांधला असा उल्लेख आहे. मात्र ह्या किल्ल्याचा बांधण्याचा कार्यकाळ 1676 आहे. त्यावेळेस शिवाजी महाराज सत्तेमध्ये होते. त्यांच्या मृत्यूनंतर 1680 च्या सुमारास संभाजी महाराज राजे झाले. त्या अंदाजानुसार शिवाजी महाराजांनीच हा किल्ला बांधला असावा या दाव्यास पुष्टी मिळते. जंजीरा किल्ल्यावरून होणारे हल्ले पाहता या किल्ल्याचे बांधकाम अर्धवट राहिले होते असाही उल्लेख काही ठिकाणी आहे.

पुण्यापासून साधारणतः 160 कि.मी. अंतरावर असणाऱ्या राजापुरीपासून केवळ 1 कि.मी. अंतरावर हा किल्ला समुद्रामध्ये वसलेला आहे. कासा नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका दगडी बेटावर हा किल्ला बांधण्यात आला. मुरूड जंजीऱ्यावरील अयशस्वी स्वारीनंतर सिद्दींवर शह बसवण्याची निकड शिवाजी महाराजांना वाटत होती. त्यादृष्टीने हा किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला मुरूड जंजीराच्या पश्चिमोत्तर बाजूला आहे. जंजीऱ्याएवढा मोठा हा किल्ला नसला तरी किल्ल्याला भेट देण्यासारखे किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करणाऱ्या चौकीचा भाग म्हणून या किल्ल्याचे महत्व होते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे आरमार उभे करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या गोदीचे कामकाज या किल्ल्यामधून चालवले जायचे. जंजीरा किल्ल्यावरून हा किल्ला अगदी सहजपणे दिसून येतो. जंजीऱ्याच्या भेटीवेळी या किल्ल्याचा उद्ध्वस्त भाग हा जंजीऱ्यावरील कलाल बांगडीने केलेल्या माऱ्याची कमाल आहे असं गाईडकडून कळलं. हा किल्ला बांधण्याचे काम सुरू असताना ह्या किल्ल्यावर जंजीऱ्यावरून तोफगोळे फेकले जायचे अशा नोंदी सापडतात. त्यामुळे ही एक शक्यता असू शकते.

संभाजी महाराजांच्या कार्यकाळात हा किल्ला सिद्दींनी जिंकला आणि आपल्या सोयीनुसार काही बदल करून घेतले अशी एक नोंद आहे. त्यानंतर हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी याचा वापर राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला असंही सांगितलं जातं. या किल्ल्यावर सुमारे 80 तोफा ठेवल्या होत्या. त्यापैकी फक्त 42 तोफा सध्या शिल्लक आहेत असंही सांगितलं जातं.. विध्वंसक पर्यटकांकडून अनेक तोफा खाली समुद्रात टाकण्यात आल्या आहेत तर काही तोफा आजुबाजूच्या पाण्यात आणि चिखलाखाली दबून गेल्या आहेत.

सध्या भारतीय नौदलाच्या ताब्यात असणाऱ्या किल्ल्यावर जाण्यासाठी नौदलाकडून परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे स्थानिक फेरी बोटी आपल्याला स्वतःच भाड्याने घ्याव्या लागतात असं आम्हाला सांगण्यात आले. मुरूडच्या कोळीवाड्यामध्ये या बोटी भाड्याने मिळू शकतात. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभरात कधीही या किल्ल्याला आपण भेट देऊ शकता. एक दिवसामध्ये आपण हा किल्ला बघून परत येऊ शकता. अर्थात, किल्ल्यावर राहण्याची व्यवस्था नाही त्यामुळे तेथे मुक्काम करता येणार नाही. किल्ल्याचे अवशेष जरी शिल्लक असले तरी त्यावरून या किल्ल्याची उपयुक्तता आणि शिवाजी महाराजांची दुरदृष्टी आपल्याला कळून चुकते.

Advertise With Us
Advertise With Us