- CITY : रत्नागिरी
- CATEGORY : समुद्रकिनारे
दापोली तालुक्यातील मुरूड बीच आणि हर्णै बीच या रस्त्यावरून जाताना हर्णे पासून साधार तीन कि.मी. अंतरावर एक शांत समुद्रकिनारा दिसेल. हा समुद्रकिनारा म्हणजेच पाळंदे बीच. आसुद गावापासून उजवीकडे वळण घेत सालदुरे मागे टाकलं की गाडी हर्णै बंदराकडे जाते. हर्णै बंदराकडे जात असताना डावीकडे पाळंदेचा समुद्रकिनारा आहे. एकेकाळी फारसा माहित नसलेला हा बीच गेल्या ५-६ वर्षांमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचे एक केंद्र बनला आहे.
पाळंदे बीचवर किनाऱ्याला लागूनच अनेक रिसॉर्ट्स आहेत. हे रिसॉर्ट मागील बाजूस थेट समुद्रकिनाऱ्यावरच आपले दरवाजे उगडतात. त्यामुळेच की काय या बीचवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस किनाऱ्यावरची पर्यटकांची गर्दी हळू हळू कमी होत जाते आणि केवळ रिसॉर्टमधले तुम्हीच तिथे उरता. रात्रीच्या वेळेस समुद्रकिनाऱ्याशेजारीच बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत जेवणाचा आनंद पर्यटकांसाठी काही औरच. इथला सुर्यास्त पाहणं हा ही एक आनंददायक अनुभव आहे.
पाळंदे बीच हा कोकणातील सुरक्षित समुद्रकिनाऱ्यापैकी एक आहे.
इथला समुद्र शांत आहे आणि समतल आहे. त्यामुळे इथे समुद्रात उतरताना कोणतीही भिती बाळगण्याचं कारण नाही. कोकणातील इतर बीचप्रमाणेच पावसाळा वगळता इतर आठही महिने हे बीच एक सुधद अनुभव देते. पांढरी / करडी मऊ वाळू आणि स्वच्छ पाणी हे या बीचचं प्रमुख वैशिष्ट्य. पाळंदे बीचवर अगदी अलिकडच्या काळात वॉटर स्पोर्ट्स पण सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे डॉल्फीन राईड्स देखील सकाळच्या वेळेत असतात. २०१५-१६ मध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा इथे गेलो होतो तेव्हा उघड्या डोळयांनी किनाऱ्यावरूनच डॉल्फीन पाहिले होते. आता मात्र, थोडं खोल समुद्रात बोट राईडनं जाव लागतं. गेल्या २-३ वर्षात पाळंदे बीचवरून थेट सुवर्णदुर्गावर देखील काही बोटी घेऊन जातात. साधारणपणे माणशी २०० रूपये हे बोटवाले घेतात.
पाळंदे बीचपासून ३ कि.मी. अंतरावर असणारे हर्णै हे गाव बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. या हर्णै बंदरावर रोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ४ वाजता मासेमारी बोटी ताजे मासे घेऊन येतात. इथे माशांचा लिलाव होतो. त्याचप्रमाणे किरकोळ मासेविक्रीही होते. येथून तुमच्या आवडीप्रमाणे मासे विकत घेऊन ते मासे रिसॉर्टवाले बनवून देतात. साधारणतः ३०० ते ३५० रू. किलोमागे हे रिसॉर्टवाले घेतात. बहुतांशी रिसॉर्टवाले शाकाहारी आणि मांसाहारी घरगुती जेवण देतात.
पाळंदे बीच येथे काय पहाल?
पाळंदे बीचपासून पाहण्याची जवळची ठिकाणे म्हणजे हर्णैचा मासे बाजार, सुवर्णदुर्ग किल्ला, मुरूड बीच, आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती ही ठिकाणे आहेत. पुण्यापासून साधारणतः २१० कि.मी. अंतरावर पाळंदे आहे. पुणे-दापोली बस प्रवास करून आणि पुढे खाजगी गाडीने तुम्ही येथे येऊ शकता. एखाद्या शांत ठिकाणी जर वीकेंड घालवायचा असेल तर पाळंदे बीच ला नक्कीच भेट द्या,