पांडेश्वर देवस्थान

शिवशंकराचे प्राचिन देवस्थान

पुण्यापासून सुमारे 62 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुणे - बारामती मार्गावर मोरगावच्या अलिकडे 14 कि.मी. वर नाझरे गावाची कमान दिसते. मोरगावचे पश्चिम प्रवेशद्वार अशी कमान असणाऱया या रस्त्याने तुम्हाला नाझरे कडे जाता येते. पुणे-सुपे मार्गावर नाझरे पासून जवळच असणाऱया पांडेश्वर (Pandeshwar) गावाजवळ असणारे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. अतिशय रेखीव असणारे हे मंदिर प्राचीन शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराच्या मुळ बांधकामाच्या नोंदी फारशा कोणाला माहित नाहीत. पुरातत्व विभागाचे तज्ञ येथे येऊन गेल्याचे गावकरी सांगतात. या मंदिरासमोरूनच कऱहा नदीचे पात्र आहे. जवळ असलेल्या नाझरे बंधाऱयामुळे नदी केवळ पावसाळ्याच्या काळातच वाहते असं ग्रामस्थ सांगतात. इतर वेळेस हे पात्र कोरडे ठणठणीत असते. पावसाळ्यात वाहणारे पाणी देखील शेती किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही असे गावकऱयांचे म्हणणे होते.

या मंदिराच्या बाहेरून तटबंदीचे देखील बांधकाम नंतरच्या काळात झाले होते. त्याचा बराचसा भाग आजही एका बाजूस शिल्लक आहे. मंदिराच्या समोर वेगळ्या मंडपात नंदी बसला असून मंडपाचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केला आहे. या नंदीच्या मागे एक तोंड उघडा असणारा स्तुप असून त्यावर बऱयाच शिल्प कोरलेली आहे. या स्तुपाच्या आत वर पर्यंत जाण्यासाठी पायऱयाही आहेत. मात्र, तेथे आत जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण, आतमध्ये मधमाशांनी आपले पोळे बांधलेले आहे. हे बांधकाम पाहिले तर ते नंतरच्या काळातले असावे असा अंदाज आहे. मंदिर परिसरात अजून पाच छोट्या गुढ्या आहेत. ती नकुल, सहदेव आणि अर्जुनाचे मंदिर असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. एका गुढीमध्ये गणेशाची शेंदुरात रंगलेली मुर्ती आहे.

या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील महादेवाची पिंड. आकाराने अतिशय मोठी असणारी ही पिंड सुमारे तीन-चार फुट उंच असणाऱया जोत्यावर वसलेली आहे. या पिंडीची अशी स्थापना होण्याचे कारण सध्याच्या ग्रामस्थांना ही माहीत नाही. अतीप्राचीन काळात येथे कोणा राजाने आपला यज्ञ केला होता आणि त्या यज्ञासाठी 33 कोटी देवांना पंगतीस बोलावले होते अशी एक आख्यायीका आम्हाला कळाली. या जेवणाच्या काळात पाऊस येऊ नये म्हणून वरूणाने या ठिकाणी आलेले पावसाचे ढग दुर सारले होते. आजही पंचक्रोशीत पाऊस सुरू झाला तरी येथे सगळ्यात उशीरा पावसाचे आगमन होते असं स्थानिकांनी सांगीतले.

या भागामध्ये प्रतापगडावरील लढाईपुर्वी अफजल खानाचे सैन्य येऊन गेल्याचे आणि त्यांनी येथील मंदिराची तोडफोड केली असल्याचे आम्हाला कळाले. या ठिकाणी जाण्याचा रस्ता अतिशय खराब आहे. कमीत कमी खराब रस्त्याने जाणे एवढेच आपल्या हातात राहते. येथून एका बाजूला भुलेश्वर तर दुसऱया बाजुला मोरगाव ही दोन ठिकाणे तुम्ही एक दिवसाच्या रपेटीमध्ये करू शकता. या रस्त्यामध्ये सिद्धेश्वर, नागेश्वर, जवळार्जुन अशी अनेक छोटी मोठी मंदीरे येथे आहेत.

Advertise With Us
Advertise With Us