1680 मध्ये महाराजांचे देहवसन झाल्यानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनी रायगडावरूनच आपला लढा सुरू ठेवला. औरगजेबाने संभाजी महाराजांना फसवून कैद केले आणि त्यांचा वध केला. मात्र, राजाराम महाराजांनी स्वराज्याचा लढा चालू ठेवला. सुर्याजी पिसाळ या फितुर किल्लेदारामुळे रायगड 1689 मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. 1733 मध्ये शाहूमहाराजांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पुढे इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यावर कब्जा करून किल्ल्याची प्रचंड नासधुस केली.
समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर असणारा रायगड किल्ला पुर्वी रायरी या नावाने ओळखला जायचा. अतिशय दुर्गम आणि जिंकण्यास अत्यंत कठीण असा हा किल्ला 1656 मध्ये शिवाजी महारांजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचा एकुण आढावा घेताच त्याची उपयुक्तता महाराजांच्या लक्षात आली. अतिशय अवघड ठिकाणात असणारा आणि सहजपणे आक्रमण करता न येणारी जागा, राज्यकारभार हाकण्यासाठी राजधानी बनविता येण्यासारखा सोयीचा विशाल डोंगरमाथा आणि सागरीमार्गही अतिशय जवळ अशा सर्वच प्रकारे मोक्याच्या जागी असणाऱया या जागेची निवड महाराजांनी आपल्या राजधानीसाठी केली. हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचा आराखडा तयार करून त्याबरहुकूम रायगड उभा केला. सुमारे 1400-1500 पायऱया चढून या गडावर यावे लागते.
राडगडावर बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने खुबलढा बुरूज, चितदरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा, महाराजांचे राजभवन, अषटप्रधानांची घरे, महाराजांची राजसभा, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, शिरकाईचे मंदीर, जगदीश्वराचे मंदीर, शिवाजी महाराजांची समाधी, टकमक टोक, हिरकणी टोक यांचा समावेश आहे. राजसभेमध्ये महाराजांचे 32 मण सोन्याचे सिहासन होते असे बखरकार सांगतात. रायगडाचे बांधकाम अनेक बाबतीत आधुनिक आहे. राजसभेचे बांधकाम अशा खुबीने केले आहे की, महाराजांच्या सिंहासनापासून ते राजसभेच्या दरवाजापर्यंत साध्या आवाजातले बोलणे देखील स्वच्छ ऐकु जावे. बाजारपेठेतील दुकांनांचे जोते विशिष्ट उंची ठेवणारे आहेत. ज्यायोगे, घोडेस्वाराला आपल्या घोड्यावरूनच व्यवहार करता यावा.
रायगडाच्या पायथ्याला पाचड नावाचे गाव आहे. रायगडावरील थंड हवा सहन होत नसल्याने शिवाजी महाराजांच्या मातोश्री जीजाऊमासाहेब या पाचड गावात बांधलेल्या वाड्यात राहात असत. याच ठिकाणी त्यांची समाधीदेखील आहे. रायगडावर जाण्यासाठी ट्रेकींगदेखील करता येते. पाचडपासून वर जायला रस्ता आहे. ज्यांना ट्रेकींग शक्य नाही त्यांच्यासाठी रोप वे ची देखील सोय आहे.
रायगड (Raigad) आणि महाराष्ट्राने अनुभवलेला संस्मरणीय सोहळा म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक. अजुनही रायगडावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी हजारो शिवभक्त आपली हजेरी लावतात आणि महाराजांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होतात.