रांजणगाव

पुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती

माधवराव पेशव्यांनी या मंदिराला देणगी दिली. या मंदिरास एक तळघरही बांधून दिले आहे जिथे गणेशाची मुर्ती ठेवता येत असे. कालांतराने इंदुरच्या सरदार किबेंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा नगारखाना मुख्य प्रवेशद्वाराच्या वर आहे. मुख्य मंदिर पेशवेकालीन आहे आणि पुर्वाभिमुखी आहे.

या गणपतीच्या पुराणकथेनुसार, गृत्स्मदऋषींच्या शिंकेतून त्रिपुरासुराचा जन्म झाला. त्याने आपल्या पित्याकडून गणेशमंत्र घेतला आणि गणेशाला प्रसन्न करून घेतले. गणेशाने प्रसन्न् त्याला तीन पुरे बनवून दिली आणि ही तीनही पुरे नष्ट केल्यास तुझा नाश होईल असे सांगितले. त्यानंतर त्रिपुरासुर उन्मत्त झाला आणि त्याने सर्वत्र हाहाकार पसरवला. घाबरलेल्या देवांनी गणेशाची प्रार्थना केली. गणपतीच्या सांगण्यानुसार, देवांनी भगवान शंकराला त्रिपुरासुराशी युद्ध करण्याची विनंती केली. मात्र, प्रयत्न करूनदेखील या युद्धात महादेव विजय मिळवू शकले नाहीत. शेवटी त्यांनी गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्या आदेशानुसार, तीनही पुरे नष्ट करून त्रिपुरासुराचा नाश केला. या गणेशाला प्रसन्न करण्यासाठी जे स्तोत्र म्हटले होते ते संकटनाशन स्तोत्र म्हणून ओळखले जाते.

या मंदिराची उभारणी अशा प्रकारे केली आहे ज्यामुळे दक्षिणायन असताना मावळत्या सुर्याची किरणे गणेशाच्या मुर्तीवर आपला अभिषेक करतात. या मंदिराचे गर्भगृह आणि बाहेरील मंडपाचे काम माधवराव पेशव्यांनी करून दिले होते. असे म्हटले जाते की, मंदिराच्या गाभाऱयात असणाऱया मुर्तीशिवाय अजून एक मुर्ती तळघरातही आहे. दहा सोंड आणि वीस हात असणाऱया या गणपतीचे दुसरे नाव महोत्कट असंही आहे. मात्र खरोखरच अशी मुर्ती आहे अथवा नाही याची निश्चित माहिती नाही. या मंदिराजवळ असणाऱया विहीरीला बारमाही पाणी असतं आणि ती कधीच कोरडी पडत नाही असंही सांगीतलं जातं.

Advertise With Us
Advertise With Us