श्रीवर्धन

Shrivardhan Beach
शांत आणि रम्य श्रीवर्धन समुद्रकिनारा | A photo by Kokan Bhatkanti

कुटुंबासहीत सुट्टी साजरी करण्याचे उत्तम ठिकाण

रायगड जिल्ह्यात वसलेले श्रीवर्धन हे पर्यटकांच्या सर्वाधिक आवडीच्या काही ठिकाणांपैकी एक आहे. श्रीवर्धनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे आहेत.

हरिहरेश्वर, दिवआगार, कोंडावली आणि श्रीवर्धन अशी ओळीने असणारे समुद्रकिनारे या भागात फिरण्याचा आनंद वाढवतात. शांत समुद्र,  मऊ वाळू आणि आजूबाजूचा डोळ्यांना सुखावणारा निसर्ग हे श्रीवर्धनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

कोकणात सर्वसाधारणपणे आढळणाऱया आमराई, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्याजोडीला समुद्र यामुळे इथे येऊन पर्यटकांची निराशा होत नाही. त्यामुळेच हे एक लोकप्रिय टुरीस्ट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबरीने श्रीवर्धनमध्ये मिळणारे कोकणी पद्धतीचा मत्स्याहार हे इथे येणाऱया पट्टीच्या खवय्याला आकर्षित करते. इथे लॉज आणि हॉटेल्स यांच्या बरोबरीने घरगुती निवासाची सोय पण आहे.

श्रीवर्धन हे दोन दिवसाच्या वीकेंडसाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्याचे सुरूवातीचे वादळी दिवस वगळता वर्षभरात कधाही भेट देता य़ईल. समुद्रकिनाऱयाजवळ लक्ष्मीनारायण देवस्थानाबरोबरच इतर अनेक देवळे आहेत. इथल्या समुद्रकिनाऱयावर फिरण्याबरोबरच जवळ असणाऱया दिवेआगार आणि हरिहरेश्वर या दोन देवस्थानांना भेटी देता येऊ शकेल. दिवेआगारला सुवर्णगणेशाचे मंदीर तर हरिहरेश्वरचे महादेवाचे मंदीर ही दोन्ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.