सिद्धटेक गणेश मंदिर

श्रीविष्णूजी द्वारा स्थापित प्राचिन गणेश मंदिर

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि पावन अशा अष्टविनायकांपैकी एक गणपती मंदिर म्हणजे सिद्धटेक येथील सिद्धीविनायक मंदिर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या उत्तरेला एका टेकडीवर हे मंदिर बांधलेले असून पर्यटकांचा आणि भाविकांनी सिद्धटेक बाराही महिने फुलून गेलेले असते. एकेकाळी केवळ होडीमधून प्रवास करून या ठीकाणी पोहोचता यायचे. मात्र काही वर्षापुर्वी या नदीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे भाविकांची चांगलीच सोय झालेली आहे.

पौराणिक संदर्भानुसार हे अष्टविनायकातील दुसरे ठिकाण आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करण्यात व्यस्त असताना मधु आणि कैटब नावाच्या दोन राक्षसांनी त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. या राक्षसांना पराभूत करण्यासाठी विष्णू युद्धात उतरले मात्र ते या राक्षसांना हरवू शकले नाही. त्यानंतर शंकराच्या सल्ल्यानुसार विष्णूंनी या ठिकाणी गणेशाची तपश्चर्या केली आणि गणेशाने प्रसन्न होऊन विष्णूंना सिद्धी प्राप्त करून दिली. आणि या राक्षसांचा विष्णूने पराभव केला. ज्या स्थानावर विष्णूने तप केले होते त्या स्थानी त्यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि त्या गणपतीला आज सिद्धीविनायक म्हणून ओळखले जाते.

या मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले असून आणि पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी नगारखाना आणि मंदिराच्या वाटचे काम केले असल्याची इतिहासात नोंद आहे. या मंदिरातील गणेशाची मुर्ती सिंहासनस्थ आहे. मोरया गोसावी यांनी इथेच गणपतीची आराधना केली होती आणि श्रीगणेशाने त्यांना मोरगाव येथे जाण्याचा दृष्टांत दिला होता असंही सांगितले जाते. सिद्धीविनायकची सोंड उजवीकडे असून जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. उत्तरमुखी असलेले हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून भाद्रपद आणि माघ महिन्यातील गणेशोत्सव काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.

Advertise With Us
Advertise With Us