पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध अशा पिकनिक स्पॉट्सपैकी एक अशी सिंहगडची सध्याची ओळख आहे. तसेच, अतिशय सोपा असा ट्रेक करण्यासाठीचा किल्ला म्हणूनही सिंहगड ओळखला जातो.
समुद्रसपाटीपासून सुमारे 1300 मीटर उंचीवर असणाऱ्या सिंहगडचा इतिहास तितकाच पराक्रमाने भरलेला आहे. सुमारे 1500 वर्षापुर्वी बांधला गेलेला हा किल्ला अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बांधलेला आहे. सह्याद्रीमध्ये असणाऱ्या भुलेश्वरच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याला नैसर्गिक कातळ कड्यांची संरक्षक भिंत मिळालेली आहे. सुमारे तीनशे वर्ष वेगवेगळ्या मुघल शासकांच्या अधिपत्याखाली आलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांना नाईलाजाने मुघलांना परत करावा लागला.
हा किल्ला परत मिळवण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी आपल्या अत्यंत निष्ठावंत आणि पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजुला सारून तानाजी मालुसरेंनी अत्यंत निवडक मावळ्यांसोबत सिंहगडावर स्वारी केली. गडाच्या एका बाजूने अत्यंत कठीण अशा ठिकाणाहून तानाजींनी आपल्या मावळ्यांसहीत गडावर प्रवेश केला आणि युद्ध सुरू केले. उद्यभानू या मुघलांच्या सरदाराला चीत करून आपले प्राणार्पण करत आपल्या अजोड पराक्रमाने तानाजी मालुसरेंनी आपला भाऊ सुर्याजीच्या साथीने हा गड पुन्हा स्वराज्यात सामील केला. 'गड आला पण माझा सिंह गेला' अशा शब्दात शिवाजी महाराजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असा उल्लेख इतिहासामध्ये आहे. तानाजी मालुसरेंच्या पार्थिव पालखीला शिवाजी महाराजांनी स्वत: खांदा दिला अशी नोंद आहे आणि हा मार्ग आता मढेघाट म्हणून ओळखला जातो.
सिंहगड त्यानंतर देखील अनेक कारणांमुळे प्रकाशझोतात होता. कालांतराने पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला 1693 मध्ये नावजी बलकवडे यांनी पुन्हा जिंकला. छत्रपती राजाराम महाराजांनी याच किल्ल्यावर आपला देह ठेवला. त्यानंतर स्वातंत्र्यपुर्व काळात लोकमान्य टिळकांचे विश्रांतीचे ठिकाण म्हणून सिंहगड ओळखला जातो. गडावर बघण्यासाठी अनेक जागा आहेत. तानाजी मालुसरेंची समाधी, राजाराम महाराजांची समाधी, लोकमान्य टिळकांच्या विश्रांतीचे ठिकाण, देव टाके, हत्ती टाके, झुंजार माची, मारूतीचे मंदिर, कल्याण दरवाजा अशी अनेक ठिकाणे भेट देता येतील. अजुन एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गडावर कोणत्याही प्रकारच्या व्यसनी वस्तू नेण्यास अथवा कोणत्याही व्यसन करण्यास बंदी आहे. याचं श्रेय सिंहगड संरक्षण समिती आणि आजुबाजुच्या गावातील तरूणांच्या गटाला जाते.
सिंहगडावरील पिठलं भाकरी, कांदा भजी, ताक आणि दही सर्वत्र प्रसिद्ध आहे. गडावर सगळीकडे फिरावं आणि नंतर झाडाच्या सावलीमध्ये बसून मस्त पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, कांदा भजी हादडावी, दही आणि ताकाचा फडशा पाडावा. सिंहगडावर तुम्ही पायथ्यापासून म्हणजे अतकरवाडी या पायथ्याच्या गावापासून ट्रेक करत जाऊ शकता. गाडी असल्यास सिंहगडावर जाण्यासाठी घाटरस्ता आहे. रस्ता थोडाफार् खराब असला तरी आपण गाडी घेऊन वर जाऊ शकता. गडावर गाडी घेऊन जाण्यासाठी प्रत्येक दुचाकी गाडीस 20 रूपये तर चार चाकी गाडीस ५० रूपये आकारण्यात येतात. गडावर पार्कींगची सोय आहे. त्याचप्रमाणे सिंहगड पायथ्यापर्यंत पीएमपीएमल ची सेवा आहे. याबरोबरच सिंहगड पायथ्यापासून वर गडावर जाण्यासाठी खाजगी वाहने शेअरींग तत्वावर उपलब्ध आहेत. सिंहगडापासून जवळ भेट देण्याची ठिकाणे म्हणजे पानशेत धरण आणि खडकवासला धरण आहे. एकदिवसीय सहलीचे एक उत्तम ठिकाण म्हणून सिंहगडचा उल्लेख करावाच लागेल.