वेळणेश्वर

शंभो शंकराचे वास्तव्य असणारे सुंदर बीच

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी पासून सुमारे 70 की.मी. अंतरावर वेळणेश्वर (Velaneshwar) आहे. अत्यंत सुंदर मऊशार वाळूचा समुद्रकिनारा, सोबत वेळणेश्वर शिवशंभोचे मंदिर या परिसरास खऱ्या अर्थाने शोभा आणतात. सर्व जगापासून लांब एकांतात जावे आणि एक शांत आयुष्य जगावे वाटले की भेट द्यावी असे हे ठिकाण....

महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरांपासून जोडलेला असणारा, आपला विकेंड आपल्याला एकदम शांत आणि मस्त अशा वातावरणात घालवायचे उत्तम ठिकाण असणारा समुद्रकिनारा कोणता असा प्रश्न जर पडला असेल तर वेळणेश्वर हे नाव आपण विचारात घ्यायला हरकत नाही. अत्यंत शानदार अशा सुखसुविधा मिळणारे तरीदेखील अद्यापही फारस व्यापारीकरण न झालेले टुरीस्ट डेस्टीनेशन म्हणून आपण वेळणेश्वर कडे पाहू शकतो.

वेळणेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले असून चिपळूणपासूम साधारणतः 70 कि.मी. अंतरावर आहे. वेळणेश्वर समुद्राच्या अगदी जवळ एका डोंगरावर वसलेल गाव आहे. डोंगराच्या माथ्यावरून थेट समुद्राकडे नेणारा वळणावळणाचा रस्ता तुमचा शीण कुठल्याकुठं पळवून लावतो. शांत वातावरणात समुद्राच्या लाटांची गुंज आणि पोफळीच्या झाडातून शीळ घालत फिरणारा वारा आपल्याला धुंद करून सोडतो. कित्येक वर्षे वेळणेश्वर हे अपुऱ्या सुविधांमुळे किंवा तिथपर्यंत जायच्या तुटपुंज्या साधनांमुळे पर्यटकांपासून लांब होते. कोकण पर्यटन केंद्र झाल्यापासून वेळणेश्वरकडे पर्यटक फिरू लागले आहेत आणि इथेही आता हळुहळू गर्दी वाढते आहे.

मस्तपैकी शीळ घालणारा, घुमणारा समुद्राचा ताजा वारा, नारळ आणि सुपारीची झाडे, आणि आपल्या चमचमत्या सोनेरी वाळून स्वागत करणारे बीच हे आहे वेळणेश्वरचे खास वैशिष्ट्य. आणि हीच वैशिष्ट्ये तुमची पर्यटनाची सुट्टी अधिक आनंददायक बनवतात आणि या ठीकाणी येऊन तुम्ही खऱ्या अर्थाने ताजेतवाने होता. खडकविरहीत फेसाळणारा समुद्र तुम्हाला आपल्याकडे बोलावत असतो आणि त्यामध्ये उतरून भिजण्याचा आनंद काही वेगळाच नाही का? कोकणात जाऊन निवांत पर्यटनाचा आनंद लुटण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी वेळणेश्वर ही एक पर्वणीच आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. सुमारे तीन किलोमीटर लांबीचं स्वच्छ बीच, ओळीमध्ये असणारी छोटी-छोटी लाल कौलारू घरं आणि किनाऱ्यालगतच असणारं वेळणेश्वराचं शात आणि पवित्र मंदिर आपल्याला शहरी ताणतणावापासून पुर्णपणे दुर आणतात.

वेळणेश्वरमध्ये छोटे मोठे ब्रेड अँड ब्रेकफास्ट सुविधा उपलब्ध असणाऱ्या जागहा आहेत जिथे तुमची राहण्याची आणि खाण्याची सोय होऊ शकते. जवळच एम.टी.डी.सी. चे हॉटेलपण आहे. फारसे समुद्रातील साहसी खेळ करण्यापेक्षा शांतपणे आपला वीकेंड ज्यांना एन्जॉय करायचा आहे त्यांच्यासाठी वेळणेश्वर हे एक उत्तम ठीकाण आहे. सतत नवीन काहीतरी शोधायची उर्मी तुम्हाला येथे जाणवत राहील. अखंड शांतता, मैलो-न-मैल समुद्राच्या वाळूत चालणं आणि नवीन ठीकाण बघायची तयारी हे ज्यांना हवं असेल त्यांनी वेळणेश्वरला एकदा तरी भेट द्यावीच.