किल्ले शिवनेरी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान

पुणे शहराच्या उत्तरेला सुमारे 85 कि.मी. अंतरावर जुन्नर तालुक्यामध्ये असणारय़ा शिवनेरी किल्ल्याला रायगडाप्रमाणेच मानाचे स्थान आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच ज्यांच्याशिवाय सुरू होऊ शकत नाही त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर झाला.

हा किल्ला महाराष्ट्रातल्या सर्वच शिवभक्तांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. राजांचे जन्मस्थान पहाण्यास, त्यांचा जन्माचा इतिहास ऐकण्यास उत्सुक मंडळी शिवजयंतीला शिवनेरीवर येतात आणि आपल्या दैवताला मानाचा मुजरा करून कृतकृत्य होतात.

शिवनेरी किल्ल्याला सातवाहन काळापासूनचा इतिहास आहे. शिवनेरीच्या तिन्ही बाजुला असणाऱया दगडी गुफांचे अवशेष आपल्याला येथील बौद्ध संस्कृतीची आठवण करून देते. सातवाहन काळानंतर हा किल्ला शिलहर, यादव, बहामनी आणि मुघल अशा विविध कुळांकडे गेला. 1599 मध्ये मालोजीराजे भोसले यांना हा किल्ला वतनात मिळाला आणि नंतर तो शहाजी राजांकडे आला. निजामशाही अस्ताला जाण्याच्या धामधुमीत शहाजी राजांनी जिजाऊंना या किल्ल्यावर आणले. 1627 साली तो मंगल दिन आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जरी महाराजांचा जन्म येथे झाला असला तरी पुढच्या काळात तहामध्ये महाराजांना हा किल्ला सोडून द्यावा लागला. आणि तो नंतर प्रयत्न करूनही जिंकता आला नाही.

पायथ्यापासून सुमारे 300 मी. उंचीवर एका डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. शिवनेरीवर जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे डांबरी रस्ता. जुन्नरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन डाव्या बाजुला वळल्यास सरळ गडाच्या पायथ्याशी गाडी घेऊन जाता येते. तिथून सरळ रस्त्याने पायऱया चढून किल्ल्यावर जाता येते.

या किल्ल्याला सात दरवाजे आहेत. महादरवाजा, परवानगीचा दरवाजा, गणेश दरवाजा, पीराचा दरवाजा, मेणा दरवाजा, शिपाई दरवाजा अशी यातील काही दरवाजांची नावं आहेत. यातील पाचवा दरवाजा हा हत्तींची धडक सुद्धा अडवता यावी यासाठी खास बनवण्यात आला आहे. या दरवाज्यावर मोठे लोखंडी खिळे ठोकलेले आहेत. गडावर चढुन आलो की, समोर अंबरखाना आहे. अंबरखान्यापासुन एक रस्ता कमानी मशिदीकडे जातो तर दुसरा रस्ता शिवजन्मस्थानाकडे जातो. शिवकुंजामध्ये बालशिवाजी आणि जिजाऊ यांचा पुतळा बसविला आहे.

या शिवकुंजासमोरच शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती इमारत आहे. ही दुमजली इमारत असुन त्याच्या तळमजल्यावर खोलीमध्ये पाळणा आणि शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. इमारती समोरच बदामी हौद आहे. तेथून पुढे कडेलोट टोकावर जाता येते. येथून पुर्वी देहदंडाची शिक्षा दिलेल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.शिवनेरी वरून समोर वडूज धरणाचा जलाशय दिसतो. त्याचप्रमाणे, हरिश्र्चंद्रगड, चावंड जीवधन आणि ऐतिहासिक नाणेघाट यांचे मार्गदेखील याच परिसरातून जवळच आहेत.

ट्रेकर्ससाठी शिवेनरी हा एक अनुभव घ्यावा असा किल्ला आहे. येथील ट्रेक थोडा अवघड आहे, त्यामुळे व्यवस्थित ट्रेकींगची आणि येथील वाटांची माहिती असेल असा गाईड बरोबर असणे गरजेचे आहे, असे आमच्या काही मित्रांनी आम्हाला सांगितले आहे. आपला महाराष्ट्र ज्याने उभारला त्या छत्रपतीला मानाचा मुजरा करण्यासाठी एकदा तरी शिवनेरीला जायलाच हवे.